नाशिक : वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. या मुलींचे कुणीतरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पहिली घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. मुरलीधर नगर येथे पाहूणी म्हणून आलेली मुलगी सोमवारी सकाळच्या सुमारास कुणासही काही एक न सांगता घराबाहेर पडली ती अद्याप परतली नाही. तिचे कुणी तरी अपहरण केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. तर दुसरी घटना फुलेनगर भागात घडली. येथील मुलगी रविवार पासून बेपत्ता आहे. तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त होत असून याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक घिसाडी करीत आहेत.