नाशिक- वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेनंतर पोलिस आयुक्तालयाच्या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी झडतीसत्र मोहीम राबवून ११३ टवाळखोरांवर कारवाई केली. या मोहिमेत २७ तडीपार गुंडांची कसून तपासणी करण्यात आली. तसेच अवैधरीत्या हत्यार सोबत बाळगणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. रात्री ८ ते ११ व मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या झडतीसत्रात पायी गस्त घालणे, गुन्हेगारांची तपासणी, हत्यार प्रतिबंधक कारवाई, काही गुन्ह्यांमध्ये संशयित असलेले आरोपींची चाचपणी, पोलिस रेकॉर्ड वरील संशयित गुन्हेगारांची तपासणी, तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची तपासणी अशा कारवाया करण्यात आल्या.
या मोहिमेसाठी पंचवटी , आडगाव , म्हसरूळ , भद्रकाली , सरकारवाडा , गंगापूर आणि मुबईनाका या सात पोलिस ठाण्यांचे प्रत्येकी एक असे सात पथके तयार करण्यात आली. या प्रत्येक पथकात एक पोलिस अधिकारी, पाच पुरुष व दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या मोहिमेत अवैधरीत्या सोबत हत्यार बाळगणाऱ्या एका व्यक्तीला पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीत, तर दुसऱ्या व्यक्तीला मुंबईनाका पोलिस स्टेशन हद्दीतून पकडण्यात आले. पंचवटी आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या २९ संशयितांच्या घरी अचानक धडक देत झडती घेतली. त्याचप्रमाणे महत्वाचे म्हणजे रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवत, वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १२ व्यावसायिकांवर देखील कारवाई केली.