कारखान्यात चोरी कामगारास अटक
नाशिक : इलेक्ट्रीक वस्तू बनविणा-या कारखान्यातील चांदीवर कामगाराने डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यात घडली असून याप्रकरणी पोलीसांनी संशयीत कामगारास बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल संजय सुर्यवंशी (२८) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. सुर्यवंशी औद्योगीक वसाहतीतील निवेक क्लब समोरील एक्सेल इंजिनिअरींग या कारखान्यातील कामगार आहे. या कारखान्यात इलेक्ट्रीक वस्तूंचे स्पेअर पार्ट बनविले जातात. बहुतांश वस्तूमध्ये चांदीचा अॅनोड आणि कॅथोड याप्रमाणे वापर केला जातो. संशयीताने शुक्रवारी (दि.११) रात्री सेवा बजावत असतांना आपल्या ताब्यातील चांदीमधून सुमारे ७३ हजार रूपये किमतीची व ९९४ ग्रॅम वजनाची अॅनोड हातोहात लांबविली. ही बाब लक्षात येताच कारखाना प्रशानाने पोलीसात धाव घेतली असून अविनाश खैरनार यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार संजय शिंदे करीत आहेत.
….