अॅप इन्स्टॉल करण्यास भाग पाडून वकिलाला एक लाख रुपयाला ऑनलाईन गंडा
नाशिक : रिचार्ज क्युब नावाचे अॅप इन्स्टॉल करण्यास भाग पाडून वकिलाला एक लाख रुपयाला ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडली आहे. मोबाईल कार्डची केवायसी करण्याच्या बहाण्याने भामट्याने हे अॅप इन्स्टॉल करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. या फसवणूक प्रकरणी अॅड.नामदेव गिते ( रा.कालिका मंदिरामागे ) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड.गिते २० मे रोजी सकाळच्या सुमारास आपल्या घरी असतांना ९६६८७३१८८५ या मोबाईलवरून त्यांच्या व्हॉटसअपवर एक संदेश आला. मोबाईल सिमकार्डची अद्याप केवायसी करण्यात आलेली नाही. केवायसी करण्यासाठी कस्टमर केअरच्या ९८८३१०५१२१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे मॅसेजमध्ये म्हटले होते. त्यामुळे अॅड.गिते यांनी संबधीत नंबरवर संपर्क साधला असता ही घटना घडली. भामट्यांनी त्यांना मोबाईलच्या प्ले स्टोर मधून रिचार्ज क्युब अॅप इन्स्टॉल करण्यास भाग पाडले. त्यातील केवायसी क्वीक सपोर्ट हे अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्यांना बोलण्यात गुंतविले. या काळात संबधीतांनी त्यांच्या एसबीआय बँक खात्याची माहिती मिळवित टप्याटप्याने ९९ हजार ९९९ रूपये परस्पर ऑनलाईन काढून घेत फसवणूक केली. अधिक तपास निरीक्षक आहिरे करीत आहेत.
…..
विषारी औषध सेवन करून आत्महत्या
नाशिक : दारूच्या नशेत विषारी औषध सेवन करून मखमलाबादरोड भागात राहणा-या एका ४० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शरद साहेबराव पाटील (४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाटील यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पाटील यांनी गेल्या बुधवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून दारूच्या नशेत विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना गुरूवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत.