नाशिक : पंचवटीतील तारावालानगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिकेने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शीतल अरविंद सरोदे (३८) असे मृत परिचारिकेचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शीतल या दिंडोरीरोडवरील तारवालानगर येथे राहत होत्या. त्यांनी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास येथे पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शीतल यांच्या भावाने हा प्रकार बघितला. त्यांनी शीतल यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
शीतल या जिल्हा रुगणालयात अतिदक्षता विभागात कार्यरत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांची मालेगाव येथे बदली झाली होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.