नाशिक – वडनेर भैरवजवळ भंगार गोळा करणार्या युवकाचा अज्ञात इसमाने खून केल्याची घटना घडली. सूरज प्रजापती असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या खून प्रकरणात अज्ञात मारेकर्याविरुद्ध खुनाचा वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश राधेश्याम गुप्ता (वय २८, रा. कपिलवस्तू तेनुवा, जि. कृष्णानगर, नेपाळ, ह. मु. पिंपळगाव बसवंत) यांनी या खूनप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की माझे पिंपळगाव बसवंत येथे भंगाराचे दुकान आहे. या दुकानात सूरज तिलक प्रजापती (वय १७, रा. कपिलवस्तू तेनुवा, नेपाळ) हा कामाला होता. आम्ही दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत. ३१ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता सूरज प्रजापती हा वडनेर भैरव गावात भंगार गोळा करण्यासाठी गेला होता. त्यावेळी प्रजापती याला गावात एक अज्ञात इसम भेटला. त्या इसमाने प्रजापती याला तुला जास्त भंगार मिळवून देतो, असे सांगून प्रजापतीला सोबत घेऊन गेला. गावापासून काही अंतरावर असलेल्या पिंपळनारे परिसरातील जांबुटके धरणाच्या बाजूला डोंगराजवळ असलेल्या झाडाझुडपामध्ये नेले. तेथे अज्ञात इसमाने प्रजापती याच्या डोक्यात उजव्या बाजूला दगडाने मारहाण केली. त्यात प्रजापती हा जागीच ठार झाला. दरम्यान, प्रजापती हा बराच वेळ झाला तरी न आल्यामुळे चौकशी केली असता त्याचा खून झाल्याचे कळाले.