कंपनीतून सव्वाआठ लाखाचे साहित्य चोरी
नाशिक : कच-यात लपवून बॉश कंपनीच्या बिल्डिंगमधून तब्बल ८ लाख ३८ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्रीकांत ज्ञानेश्वर चव्हाण (रा. गंगापूररोड) यांनी सातपुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, कंपनीत काम करणारे काही संशयित कामगार, चहा, नाश्ता पुरवणारे कर्मचारी, कॅन्टीनमधील संशयित कामगार व कचरा घेवून जाणा-या संशयितांनी सप्टेबर २०२० ते १२ जून २०२१ दरम्यान बॉश कंपनीतील बिल्डिंग १०१ ते १०५ मधील साहित्य चोरून नेले. त्यात ४ लाख ५७ हजार १३२ रुपये किंमतीचे सीकेडी वॉलसेट, १ लाख १० हजार रुपये किंमतीचे नोझल, १ लाख १३ हजार ७५० रुपये किंमतीचे पिस्टन आणि १ लाख ५७ हजार ५०० रुपये किंमतीचे वॉलपीसचा समावेश आहे. संशयितांनी संगनमत करून कच-यात ठेवून या साहित्याची चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहे.
————–
खांबाला धडकून एक ठार
नाशिक : भरधाव मोटरसायकल विद्युत पोलला धडकून एकाचा मृत्यू झाला. आकाश यशवंत मोंढे (रा. अवधुतवाडी, पेठरोड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ११) सकाळी साडेआठच्या सुमारास आकाश मोंढे हा मोटरसायकल क्र. (एमएच १५ डीएक्स ९८०७) घेवून मखमलाबाद रोडकडून तुजळाभवानी रोडकडे जात होता. यावेळी त्याने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने मोटरसायकल चालवली. त्यामुळे नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल इलेक्ट्रीक पोलला धडकली. यात आकाश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डंबाळे तपास करत आहे.
———
गळफास घेवून आत्महत्या
नाशिक : फॅनला साडीचा गळफास करुन तरुणाने आत्महत्या केली. निरज धर्मा पारचे (वय १९, रा. जुने नाशिक) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. निरज याने रविवारी (दि. १३) सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेतला. त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिका-यांनी तपासून मयत घोषित केले. घटनेचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.