नाशिक: पाईपलाईन रोडवर एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या तरुणाचा मृतदेह गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाईपलाईन रोडवर आढळून आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. दरम्यान, महिला पोलिस कर्मचारी सरला खैरनार यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर नाशिक पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. शहरात गेल्या चौदा दिवसांमधील हा सातवा खून असल्यामुळे शहरात यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात एका पाठोपाठ एक तरुण मुलांच्या खुनाच्या घटना घडत असून या घटनेमागे क्षुल्लक कारण असल्याचेही तपासात पुढे आले आहे.