सोसायटीच्या जिन्यात पाय घसरून पडल्याने ७६ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू
नाशिक : चुंचाळे शिवारात सोसायटीच्या जिन्यात पाय घसरून पडल्याने ७६ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाला. लिला मोहन गवळी (रा.बिल्डींग.नं.४ घरकुल योजना ) असे मृत वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गवळी या सोमवारी रात्री जेवण आटोपून पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. सोसायटीच्या पाय-या उतरत असतांना अचानक पाय घसरल्याने त्या पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. कुटुंबियांनी त्यांना बेशुध्द अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
आत्महत्या केल्याच्या दोन घटना
नाशिक : शहरातील वेगवेगळ्या भागात मंगळवारी दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. या दोन्ही व्यक्तींचे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना गंजमाळ भागात घडली आहे. सुरेश बाबूराव लहानगे (३७ रा.भिमवाडी,सहकारनगर) यांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून छताच्या लाकडाला स्कार्प बांधून गळफास लावून घेतला होता. पत्नी सुशिला लहानगे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक रायते करीत आहेत. दुस-या घटनेत कैलास भास्कर लकारे (३९ रा.अजगर अली चाळ,बोरी मज्जीदरोड) यांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब निदर्शनास येताच भाऊ गणेश लकारे यांनी त्यांना तातडीने देवळाली कॅम्प येथील कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.