अंडारोलच्या ऑर्डरवरुन तरुणास टोळक्याकडून बेदम मारहाण
नाशिक : महामार्गावरील जत्रा हॉटेल भागात किरकोळ कारणातून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत टोळक्याने तरुणांच्या नुकसान करण्यात केले. याप्रकरणी अजिंक्य तानाजी लभडे (२६ रा.कोनार्क नगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. सुशांत नाटे व त्याच्या सात ते आठ साथीदारांनी हा हल्ला केल्याचे त्यात म्हटले आहे.याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लभडे सोमवारी रात्री जत्रा हॉटेल समोरील एसबीआय बँकेजवळील डी.एम.अंडारोल या खाद्यपदार्थाच्या गाडीवर जेवणासाठी गेला होता. बराच वेळ उभे राहूनही विक्रेत्याने अंडारोल न दिल्याने त्याने माझी ऑर्डर उशीरा का देता ? अशी विचारणा केली असता शेजारी उभ्या असलेल्या गट्या नामक तरूणाने सुशांत नाठे व त्याच्या साथीदारास फोन करून बोलावून घेतले. संतप्त टोळक्याने लभडे यास शिवीगाळ करीत बांबू आणि लोखंडी रॉडने त्यास बेदम मारहाण केली. यावेळी नाटे याने वजनी दगड मारल्याने लभडे गंभीर जखमी झाला असून, याप्रसंगी टोळक्याने त्याच्या एमएच १५ ईबी ८३४९ या वाहनाच्या दगडाने काचा फोडून नुकसान केले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर करीत आहेत.
महिलेच्या गळयातील पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेली
नाशिक : वासननगर भागात परिसरातून फेरफटका मारणा-या महिलेच्या गळयातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. राहूल अशोक महाजन (रा. अभिनंदन लॉन्स पाठीमागे,वासननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाजन यांच्या आई मंगळवारी रात्री जेवण आटोपून परिसरात फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. महालक्ष्मी दर्शन रो हाऊस या राहत्या ठिकाणा पासून काही अंतरावर त्या रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून ट्रिपलसिट आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळया्तील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.