हळदी कुंकवाचे दुकान फोडून चोरट्यांनी २४ हजाराचे पूजेचे साहित्य केले लंपास
नाशिक : सरदार चौकात हळदी कुंकवाचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे २४ हजार रूपये किमतीचे पुजेचे साहित्य लंपास केले. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मकसुद बाबा अत्तार (रा.दत्त चौक,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्तार यांचे सरदार चौकात साईबाबा कुंकू भांडार नावाचे दुकान आहे. गेल्या बुधवारी रात्री ते आपले दुकान वाढवून घरी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुकानात प्रवेश करून देवदेवतांच्या पुजेसाठी लागणारे साहित्य,नवरदेवांचे बाशिंग,रूद्राक्ष माळा,स्फटीक माळा,देविचा साज असा सुमारे २३ हजार ८०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दुसºया दिवशी अत्तार यांनी दुकान उघडले असता निदर्शनास आली. दुकानातील सीसीटिव्ही यंत्रणेची तपासणी केली असता मध्यरात्री एकाने दुकानात प्रवेश करून ही चोरी केल्याचे समोर आले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अदिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.
लॅपटॉप चोरून नेल्याची घटना
नाशिक : पेठरोड भागात घराची कडी उघडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सम्राट हर्शवर्धन रोकड (रा.वरदकृपा सोसा.यशोदानगर,मेहरधाम) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रोकड गेल्या बुधवारी सायंकाळच्या सुमारास अल्पशा कामासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घराची कडी उघडून टेबलावर ठेवलेला लिनोओ कंपनीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.