तलवार घेवून फिरणा-या दोघाना पोलिसांनी केले गजाआड; धारदार तलवार हस्तगत
नाशिक : गोसावीवाडीत दहशत माजविण्यासाठी तलवार घेवून फिरणा-या दोघाना पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्या ताब्यातून धारदार तलवार हस्तगत केली आहे. योगेश राजेंद्र जाधव (२२) व पवन परशराम आहिरे (२७ रा.दोघे गोसावीवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोसावीवाडीतील पिंपळे सदन भागात दोन युवक सोमवारी सायंकाळच्या सुमारास नागरीकांना तलवारीचा धाक दाखवत दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नाशिकरोड पोलिसांनी धाव घेत दोघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई कैलास झाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार हिरे करीत आहेत.
गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक : ४८ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना जुने नाशिक परिसरातील पिंजारघाट रोड भागात घडली आहे. या महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रूबीना आझाद शेख (रा.बडीदर्गा,पिंजारघाटरोड) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून पाचव्या मजल्यावरील आपल्या राहत्या घरात छतास असलेल्या पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.