बसप्रवासात सहप्रवासी महिलेने दोन लाखाचे दागिने असलेली बँक केली लंपास
नाशिक : कळवण ते तारवालानगर दरम्यान सहप्रवासी असलेल्या महिलेने बसप्रवासात महिलेच्या बॅगेतील पर्स चोरल्याची घटना घडली आहे. या पर्स मध्ये सुमारे दोन लाख रूपये किमतीचे अलंकार होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली देवेंद्र सुर्यवंशी (रा.देशमुख नगर,सिन्नर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सुर्यवंशी या रविवारी (दि.२९) कळवण नाशिक या बसमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. सुर्यवंशी या कळवण येथे गेल्या होत्या रविवारी त्या परतीचा प्रवास करीत असतांना त्यांच्याजवळ एक महिला बसली होती. प्रवासात भामट्या महिलेने सुर्यवंशी यांचे लक्ष नसल्याची संधी साधत बॅगेची चैन खोलून पर्स चोरून नेली. सदर महिला तारवाला नगर येथे उतरून गेली असता ही घटना उघडकीस आली. पर्स मध्ये सोन्याचा राणी हार,नेकलेस,पोत,कानातले,सोनसाखळी आणि नथ असा सुमारे १ लाख ९२ हजार रूपये किमतीचे दागिणे होते. अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत.
तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी केला लंपास
नाशिक : लोखंडे मळा भागात मोबाईलवर बोलत फेरफटका मारीत असलेल्या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी लंपास केला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम रविंद्र देवरे (२७ रा.रघुवीर हौ.सोसा.गोसावीमळा) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. देवरे शनिवारी (दि.२८) रात्री जेवण आटोपून परिसरातील लोखंडे मळा भागात फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. म्हसोबा मंदिर भागातून तो मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या एमएच १५ जीजे २३०५ वरील दोघांपैकी एकाने देवरे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.