नाशिक – टाकळी येथील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मयताच्या नातेवाईकांनी शुक्रवारी पहाटे सुविचार रुग्णालयात दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीनंतर रुग्णालयाची तोडफोड करुन परिचारिका व कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणी डॉ. अविनाश आंधळे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित प्रशांत नथू गांगुर्डे यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांची रुग्णालय प्रशासनबरोबर वाद झाला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यासंस्कार केले. त्यानंतर रुग्णालयात रुग्णाला दाखल करताना डिपॉजिटची मागणी करण्यात आल्याचा राग मनात धरून मयत विक्रम नथू गांगुर्डे यांचा भाऊ प्रशांत नथू गांगुर्डे यांनी त्याच्या साथीदारांसह शुक्रवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास रुग्णालयात येत डिपॉजिट मागणाऱ्या कर्मचाऱ्याला व परिचारिकेला मारहाण केली. त्याचप्रमाणे दगडफेक करून रुग्णालयाच्या व रुग्णवाहिकेच्या काचा फोडून नूकसान केल्याची घटना घडली.