नाशिक : २६ वर्षीय विवाहीतेवर बलात्कार केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास पगार (रा.राठीचाळ,पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेने दुस-याशी विवाह केल्यानंतर संशयीताने अश्लिल छायाचित्र नव-यास दाखविण्याची धमकी देत शरिरसुखासाठी तगादा लावल्यामुळे पीडितेने पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडितेचे काट्यामारूती परिसरात माहेर कडील मंडळीचे किराणा दुकान आहे. २०१५ पासून संशयिताचे दुकानात येणे जाणे होते. तरूणी दुकानात असतांना तो येत असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. यातून त्याने लग्नाचे आमिष दाखविल्याने दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या काळात संशयिताने युवतीस आपल्या चारचाकीतून नविन आडगाव नाका भागातील बस डेपो पाठीमागील सर्व्हीस रोडवर घेवून जात वेळोवेळी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत वाहनातच बळजबरीने बलात्कार केला. यावेळी त्याने दोघांचे अश्लिल छायाचित्र काढले. डिसेंबर २०२१ मध्ये कुटुंबियांनी युवतीचा दुसरे स्थळ शोधून दुस-याशी विवाह लावून दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने विवाहीतेशी संपर्क साधत तू जर माझ्या समवेत आली नाहीस तर तझे व माझे फोटो आणि व्हिडीओ तुझ्या पतीला दाखविल अशी धमकी दिल्याने भेदरलेल्या विवाहीतेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक धनश्री पाटील करीत आहेत.