नाशिक : अस्तित्वात नसलेल्या व्यावसायीक कंपनीत नफ्याचे आमिष दाखवत गुंतवणुक करण्यास भाग पाडून तिघांनी एकास पाच लाखाला गंडा घातला आहे. या फसवणूक प्रकरणी संजय हरिप्रसाद कनोजी (रा.कलानगर,ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मंजू सुशांत पॉल,सुशांत अबोनी पॉल व अबोनी निवारण पॉल (रा.अॅप्पलवुडस,अशोका स्कूल जवळ,खोडेनगर) अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत. नफा व मुद्दल देण्यास टाळाटाळ करून संशयितांनी घरात घुसून जीवे ठार मारण्याची व खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे परिचीत असून गेल्या वर्षी संशयितांनी कनोजी यांना गाठून आपल्या व्यावसायीक कंपनीत मोठा नफा असल्याची बतावणी करीत अस्तित्वात नसलेल्या कंपनीत गुंतवणुक करण्यास भाग पाडले. गुंतवणुकीवर मोठा नफा देवू असे आमिष दाखविण्यात आल्याने महालक्ष्मी एंटरप्रायझेस या अस्तित्वात नसलेल्या कंपनीत कनोजी यांनी गुंतवणुक करण्यास तयारी दर्शविला. दि.१ ऑगष्ट २०२१ रोजी याबाबत नोटरी करारनामा करून संशयितांनी पाच लाखाची गुंतवणुक स्विकारली. वर्ष उलटूनही नफा अथवा मुद्दल पदरात न पडल्याने कनोजी यांनी पैश्यासाठी तगादा लावला असता संशयितांनी टाळाटाळ करीत त्यांचे घर गाठून जीवे मारण्याची व खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक आर.ए.शिंदे करीत आहेत.