नााशिक – विषारी सापाने चावा घेतल्याने ३० वर्षीय विवाहीतेचा मृत्यू
नाशिक : बेलतगव्हाण येथे विषारी सापाने चावा घेतल्याने ३० वर्षीय विवाहीतेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यमूना वसंत बेंडकुळे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बेंडकुळे या गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या घरासमोर साफसफाई करीत असतांना ही घटना घडली. अंगणातील झुडपांची घाण काढत असतांना अचानक त्यांच्या उजव्या हाताच्या बोटास विषारी सापाने चावा घेतला. ही घटना लक्षात येताच दिर केशव बेंडकुळे यांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक देवरे करीत आहेत.
महिलेच्या गळयातील सव्वा दोन लाखाची सोन्याची पोत ओरबडली
नाशिक : सोमेश्वर परिसरात विवाह सोहळा आटोपून वाहनाच्या दिशेने पार्किंकडे जाणा-या महिलेच्या गळयातील सव्वा दोन लाख रूपये किमतीचे सोन्याची पोत आणि मंगळसूत्र भामट्याने ओरबाडून नेले. श्वेता सचिन बोरस्ते (रा.लालबाग चौक,चेतनानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरस्ते कुटुंबिय बुधवारी रात्री नातेवाईकांच्या विवाह सोहळया्साठी सोमेश्वर नजीकच्या गुप्ता गार्डन येथे गेल्या होत्या. रात्री विवाह सोहळा आटोपून त्या कुटुंबासह वाहन पार्क केलेल्या पार्किंगकडे जात असतांना ही घटना घडली. अंधारात पाठीमागून आलेल्या भामट्याने त्यांच्या गळय़ातील दोन लाख १५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत व मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.