कोयत्याच्या धाक दाखवून मारहाण करुन तरूणाची लुट
नाशिक : नाशिकरोड भागात कोयत्याच्या धाक दाखवून मारहाण करीत तरूणास लुटल्याची घटना घडली. या घटनेत जखमी तरूणाच्या गळयातील सोनसाखळी, अंगठी, रोकड व मोबाईल असा सुमारे ६२ हजाराचा ऐवज टोळक्याने काढून घेतला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण लवटे (रा.देवळाली गाव), दानिश शेख व त्यांचे चार अनोळखी साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी यामीन मोहम्मद सय्यद (२३ रा.वरची गल्ली,देवळालीगाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. सय्यद बुधवारी सॅण्डी बेकर्सच्या जवळील रस्त्याने जात असतांना संशयितांनी कोप-यात अडवून त्याची वाट अडविली. यावेळी टोळक्याने त्यास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करीत खिशातील दहा हजाराची रोकड, गळयातील दोन तोळय़ाची सोनसाखळी, अंगठी आणि मोबाईल असा सुमारे ६२ हजाराचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला. या घटनेत सय्यद जखमी झाला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक पंकज भालेराव करीत आहेत.
वेगवेगळय़ा भागात दोन आत्महत्या
नाशिक : वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शहर व परिसरात घडली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मॉडेल कॉलनीत राहणारे अमोल अशोक देशमुख (४० रा.वसंत विहार सोसायटी) यांनी मंगळवारी (दि.२४) रात्री आत्महत्या केल्याचे समोर आले. अमोल देशमुख यांनी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी निलेश देशमुख यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत. दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. आकाश राजेंद्र अहिरराव (२३ रा. साईबाबा मंदिरामागे,मुरलीधरनगर) या युवकाने बुधवारी (दि.२५) सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत सुरेश अहिरराव यांनी खबर दिल्याने इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.