नाशिक : शेजा-याने अश्लिल छायाचित्र व्हायरल करण्यासह मुलास जीवे मारण्याची धमकी दिल्याने या जाचास कंटाळून ३६ वर्षीय विवाहीतेने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र गोविंद आल्हाटे (रा.दिपलक्ष्मी हौ.सोसा.श्रीधर कॉलनी,पेठरोड) असे महिलेस आत्महत्येस प्रवृत्त करणा-या संशयिताचे नाव आहे. मृत महिला व संशयित एकाच भागातील रहिवासी आहेत. मृत महिलेने गेल्या शनिवारी (दि.२१) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गव्हात टाकण्याचे विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या आत्महत्येचा कुटूंबियांनी शोध घेतला असता संशयिताच्या जाचामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे. रोज गुड मॉर्निंग, लव यू असा संदेश मोबाईलवर पाठवायचा. जेव्हा बोलवेल तेव्हा भेटायचे नाही तर तुझे अश्लिल फोटो व्हायरल करून बदनामी करेल तसेच तुझ्या मुलालाही जीवे ठार मारेल अश्या धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयिताच्या नियमीत मानसिक जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.