नाशिक – वाहन पंक्चर करुन उद्योजक मधुकर शंकर टिळे यांची पाच लाख रुपयाची बॅग चोरटयांनी लंपास केल्याची घटना चोपडा लॉन्स ते निमाणीच्या मार्गावर घडली आहे. टिळे हे दोन वाजेच्या सुमारास जुना आडगाव नाका येथे गेले होते. त्यावेळेस पाठींमागून आलेल्या दुचाकीवरील एका अज्ञात इसमाने उजव्या बाजूचे मागील टायर पंक्चर असल्याचे त्यांना सांगितले. यानंतर टिळे हे काट्या मारुती चौकात असलेल्या पेट्रोल पंप जवळील पंक्चर दुकानात गेले. येथे त्यांना जाणीवपूर्वक पंक्चर केले असल्याचे पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीने सांगितले. टायर पंक्चर काढल्या नंतर टिळे यांना वाहनातून पाच लाख रुपये असलेली बॅग चोरीला गेली असल्याचे समजले. तात्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.