नाशिक : शिष्यवृत्तीच्या बहाण्याने पालकांना लाखों रूपयांना गंडविणा-या संशयीतास पोलीसांनी अटक केली. ठाणे शहरात जावून सायबर पोलीसांनी ही कारवाई केली असून संशयीतास न्यायालयाने सोमवार (दि.१४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
निलेश क्लिफोर्ड फर्नांडिस (४५, रा. मालाड वेस्ट) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ठाणे जिल्ह्यात सर्व शिक्षा सोल्युशन एलएलपी या कंपनीच्या नावे कॉल सेंटर सुरु करुन संशयित राज्यातील पालकांशी संपर्क करीत होता. शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सोप्या भाषेत समजेल या पद्धतीने तयार केला असून, तो पेन ड्राइव्ह किंवा सीडीमार्फत दिला जाईल.
त्यामोबदल्यात १२ हजार रुपये शुल्क असून ही सुविधा घेतल्यास लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही मिळेल असे आमिष दाखवून ही फसवणुक केली जात होती. या आमिषाला भुलून अनेक पालकांनी पैसे भरले. नाशिकमधील सिडको भागात राहणा-या एका पालकांनी जानेवारी २०२० मध्ये कंपनीस पैसे पाठवले. त्यानंतर विद्यार्थ्यास ३ लाख ८२ हजार ७६० रुपयांची स्कॉलरशिप मिळाल्याचे सांगून भामट्याने पालकांकडून २ लाख ७२ हजार ५०० रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली होती.
सायबरचे पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवराज बोरसे यांच्यासह उपनिरीक्षक दानिश मन्सुरी, अंमलदार किरण जाधव, योगेश राऊत, पराग गायकवाड, सविता गावले यांच्या पथकाने तांत्रिक तपास करुन ठाणे जिल्ह्यातील कॉल सेंटरवर छापा टाकून फर्नांडिस यास अटक केली. या ठिकाणाहून पोलिसांनी ३८ मोबाइल, ३ लॅपटॉप, २ टॅब, ११ पेन ड्राईव्ह असा मुद्देमाल जप्त केला आहे. या भामट्याने नाशिकसह राज्यभरातील पालकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्यात अनेकांनी ५ ते १० लाख रुपये संशयितास दिल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.