नाशिक : बजरंगवाडीत हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणातून झालेल्या वादानंतर एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्यामुळे २१ वर्षीय तरूण जखमी झाला आहे. या हल्ल्याप्रकरणात पोलिसांनी चार जणांना गजाआड केले आहे. अक्षय देविदास जाधव,ज्ञानेश्वर गंगाधर दिवे,प्रविण मोहन पिठे व रूपेश मधुकर पिठे (रा.सर्व बजरंगवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी जखमी संकेत नंदकिशोर तोरडमल (२१ रा.संताजीनगर बजरंगवाडी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. तोरडमल गुरूवारी रात्री परिसरात राहणा-या आपल्या मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात गेला होता. या ठिकाणी नाचत असतांना संशयितामध्ये त्याचा वाद झाला होता. धक्का लागल्याच्या कारणातून संशयितांनी त्यास धक्काबुक्की केली. त्यानंतर कार्यक्रम आटोपून तो घराकडे निघाला असता हनुमान मंदिरा समोर संशयितांनी त्यास गाठून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत त्याच्या डोक्यावर पोटावर व पाठीवर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी असून अधिक तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत.
…..