नाशिक : सोसायटीच्या आवारातील झाडे तोडणे तीन सदस्यांना पडले महागात; विविध कलमान्वये गुन्हा दाखल
नाशिक : सोसायटीच्या आवारातील झाडे तोडणे तीन सदस्यांना चांगलेच महागात पडले आहे. संबधीवर उपनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासूदेव भोर,अजित कुलकर्णी आणि रवि जायभावे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी एजाज शेख (रा.दत्तमंदिररोड दे.गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. शहरात पावसाळय़ापूर्वी धोकादायक झाडे तोडण्याचा सपाटा सुरू आहे. संबधितांनी गायकवाड मळा येथील राहत असलेल्या श्री सोसायटी आवारातील नारळ,अशोका आणि पारिजात अशी चार झाडे विनापरवानगी तोडली. ही घटना गेल्या शुक्रवारी (दि.१३) उघडकीस आली. शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबधितावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५ सुधारित अधिनियम २००६ कलम २१ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक शेख करीत आहेत.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक – सिडकोतील उत्तमनगर भागात एका ३० वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नरेंद्र पुरूषोत्तम पाटील (रा.शुभम पार्क,गजानंद नगर चर्च पाठीमागे) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. पाटील यांनी गुरूवारी (दि.१९) रात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून छताच्या हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत शालक केतन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.