नाशिक : मालकाचे रो हाऊस बळकावण्यासाठी नोकराने बनवले बनावट दस्तऐवज; फसवणूकीचा गुन्हा दाखल
नाशिक : मालकाचे रो हाऊस बळकावण्यासाठी नोकराने बनावट दस्तऐवज तयार करून मालकी हक्क सांगत न्यायालयात दावा ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वृध्द व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात नोकराविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चिंतामण दुंदडे (४२ रा.दिपनगर रो हाऊस नं.११,नाशिक पुणा मार्ग) असे संशयित नोकराचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत अरूण संघई (६२ रा.दातेनगर,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. संघई यांचा लोखंडी पत्र्याचा व्यवसाय असून त्यांच्याकडे २००३ पासून संशयित सेल्समनचे काम करीत आहेत. व्यवसायात संशयिताने संघई यांचा विश्वास संपादन केल्याने २००६ मध्ये त्याच्या वास्तव्यासाठी संघई यांनी नाशिक पुणे मार्गावरील आपला दीपनगर रो हाऊस उपलब्ध करून दिला होता. कालांतराने हा रो हाऊस बळकविण्याच्या उद्देशाने संशयित सेल्समनने बनावट दस्तऐवज तयार करून सदर मालमत्ता आपली असल्याचे भासवून न्यायालयात खोटा मालकी हक्काचा दावा ठोकला. याबाबत माहिती मिळताच संघई यांनी पोलीसात धाव घेतली असून,अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
घरफोडीत ३६ हजाराच्या ऐवज लंपास
नाशिक : घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३६ हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना वडाळा पाथर्डी रोडवरील कलानगर सिग्नल भागात भरदिवसा घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र भगवानदास नावरे (५५ रा.बालाजी पॅलेस बिल्डींग,कोटक महिंद्रा बँकेसमोर) यांनी तक्रार दाखल केली आहे. नावरे कुटूंबिय गुरूवारी सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे ३६ हजार २०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास महिला उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.