नाशिक : सिडकोत हद्दपारीची कारवाई केलेल्या तरूणास पोलिसांनी केले गजाआड
नाशिक : सिडकोत हद्दपारीची कारवाई केलेल्या तरूणास पोलिसांनी गजाआड केले आहे. शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर उर्फ गुरू गणपत पवार (२० रा.राधेकृष्ण चौक,सावतानगर) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. गुरू पवार याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलीसांनी त्यास सहा महिन्यासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. अंबड पोलीस त्याच्या मागावर असतांनाच गुरूवारी तो आपल्या घरात असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली. वरिष्ठांच्या आदेशाने सापळा लावून संशयितास जेरबंद करण्यात आले. याप्रकरणी युनिट २ चे कर्मचारी चंद्रकांत गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.
मिटर पेटीतून चोरीस
नाशिक : इंद्रकुंड परिसरातील वल्लभ बैठक मठ भागात मिटर पेटीतून चोरट्यांनी एका महिला ग्राहकाचे वीज मिटर चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद पदमाकर चव्हाण (रा.तिरूमाला पॅराडाईज.चेतनानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण यांच्या काकू सिंधूबाई माधवराव चव्हाण या इंद्रकुंड समोरील वल्लभ बैठक मठात राहतात. मठातील मिटर पेटीतील त्यांच्या नावे असलेले वीज मिटर चोरट्यांनी खोलून नेले. ही घटना सोमवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास घडली. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.