अपघातस्थळावरून मोटारसायकल चोरली; डिक्कीतून रोकडसह महत्वाची कागदपत्र केली लंपास
नाशिक : हनुमाननगर भागात चोरट्यांनी अपघातस्थळावरून मोटारसायकल चोरून नेल्याची घटना महामार्गावरील घडली. दुचाकीच्या डिक्कीत १५ हजाराची रोकड व महत्वाची कागदपत्र होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजा अहमद काझीम शेख (४२ रा.हरिस्मृती सोसा.कठडा,टाकळीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रजा शेख गेल्या रविवारी (दि.१५) मालेगाव येथे गेले होते. एमएच १५ जीएस २२०९ या दुचाकीवर ते परतीचा प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. महामार्गावरील हनुमाननगर परिसरातील पेशवा हॉटेल भागात दुचाकीस अपघात झाला. या घटनेत रजा शेख जखमी झाल्याने त्यांच्या भावाने त्यांना उपचारार्थ नजीकच्या रूग्णालयात दाखल केले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी अपघातस्थळावरून त्यांची दुचाकी चोरून नेली. या दुचाकीच्या डिक्कीत १५ हजाराची रोकड आणि महत्वाची कागदपत्र होती. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
पार्क केली मोटरसायकल चोरीला
नाशिक – वडाळा पाथर्डी मार्गावरील प्रशांत इच्छाराम चौधरी (रा.गुरू गोविंद सिंग कॉलेज जवळ) गेल्या गुरूवारी (दि.१२) निमाणी बसस्थानक भागात गेले होते. आयुष हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली एमएच १५ एफएक्स २१४५ पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक बैरागी करीत आहेत.
वर्कशॉप चालकाने आपल्या दुकानात गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक : चुंचाळे शिवारात औद्योगीक वसाहतीतील ३४ वर्षीय वर्कशॉप चालकाने आपल्या दुकानात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. सुरेश सुकदेव माळी (रा.अशोक कल्पतरू कॉलनी,चुंचाळे शिवार) असे आत्महत्या करणा-या व्यावसायीकाचे नाव आहे. सदर व्यावसायीकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माळी यांनी बुधवारी (दि.१८) अज्ञात कारणातून घराशेजारील आपल्या एस.एस.एन्टरप्राईजेस या वर्कशॉपमध्ये अॅगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना निदर्शनास येताच भाऊ दिलीप माळी यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.