इंदिरानगरला महिलेचा विनयभंग
नाशिक : पाहुणी म्हणून आलेल्या नातेवाईक महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना चार्वाक चौक परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल कैलास शेजवळ (रा.इंदिरानगर) असे संशयीताचे नाव आहे. संगमनेर येथील २१ वर्षीय पीडित विवाहीता व संशयीत एकमेकांचे नातेवाईक असून ती पाहुणी म्हणून संशयीताच्या घरी आली असता ही घटना घडली. बुधवारी (दि.९) रात्री घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयीताने मला तुझेशी संबध ठेवायचे आहेत असे म्हणून विनयभंग केला. अधिक तपास हवालदार ठाकरे करीत आहेत.
…..
आनंदवलीत तडिपार जेरबंद
नाशिक : शहर आणि जिह्यातून हद्दपार केलेले असतांना शहरात वावरणा-या तडीपारास पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई आनंदवलीतील स्मशानभूमी भागात करण्यात आली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय शिवाजी मिसाळ (रा.बजरंगनगर,आनंदवली) असे संशयीताचे नाव आहे. गुन्हेगारी कारवायांमुळे मिसाळ यास शहर पोलीसांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा शहरातच वावर असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना शुक्रवारी (दि.११) सायंकाळी तो बजरंगनगर येथील स्मशानभूमी भागात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गंगापूर पोलीसांनी त्यास सापळा लावून जेरबंद केले असून याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुनिल पाडवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गिरीष महाले करीत आहेत.
……
दुचाकीस्वारास जीवे मारण्याचा प्रयत्न
नाशिक : दुचाकी अडवित मागील भांडणाची कुरापत काढून सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ड्रिमसिटी परिसरातील तपोवन चौफुली येथे घडली. या घटनेत दुचाकीस्वारास मारहाण करीत चाकूने वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत पगारे,प्रेम सुधाकर पवार,निखील अनिल बेग व आकाश बाळू दाणी व अन्य एक जण अशी संशयीतांची नावे असून ते पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. याप्रकरणी रोषण वसंत पगारे (२३ रा.केवडीबन,पंचवटी कॉलेज मागे) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पगारे व बॉबी भालेराव हे दोघे मित्र गुरूवारी (दि.१०) रात्री टाकळीरोडमार्गे आपल्या घराकडे मोपेड दुचाकीवर जात असतांना ही घटना घडली. मोटारसायकलींवर आलेल्या टोळक्याने तपोवन चौफुलीवर मोपेड अडवित भालेराव याच्या समवेत का राहतो असे म्हणून व मागील भांडणाची कुरापत काढून पगारे यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी संशयीत अनिकेत पगारे याने धारदारचाकूने त्याच्यावर सपासप वार केले. या घटनेत रोषण पगारे गंभीर जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.