नाशिक – दोन मुलींसह एका मुलाचे अपहरण झाल्याच्या घटना शहरात वेगवेगळ्या भागात घडल्यामुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे. या तिन्ही प्रकरणात पोलिस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर व अंबड परिसरात या तिन्ही घटना घडल्या आहे. पहिली घटना सातपूर पोलीस ठाण्यात घडली असून येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलाच्या अपहरणाप्रकरणी मानसी राजेश गांधी (वय ४८, रा. किया शोरूमशेजारी, सातपूर एमआयडीसी, नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, माझा मुलगा हा काल सकाळी ८ वाजता घरात अभ्यास करीत होता. अभ्यास करीत असताना तो घराबाहेर कोणाला काही न सांगता कुठे तरी गेला. तो अद्याप परत आला नाही. त्याचा आजूबाजूला, तसेच मित्रांकडे तपास केला असता तो मिळून आला नाही. त्याला कोणी तरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. तर दुसरा अपहरणाचा गुन्हा अंबड परिसरात घडला आहे. येथे फिर्यादी महिलेच्या घरी बहिणीची मुलगी ही आली होती. ही मुलगी काल सकाळी घरी असताना अज्ञात इसमाने तिला कशाचे तरी आमिष दाखविले, तसेच तिला फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिसरा प्रकार अंबड परिसरातच घडला आहे. फिर्यादी यांची मुलगी १६ मे रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास घरी होती. त्यावेळी कोणी तरी अज्ञात इसमाने तिला आमिष दाखवून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.