नाशिक – चेतनानगर येथे घरफोडी; चोरट्यांनी केला सव्वा लाखाचा ऐवज लंपास
नाशिक : चेतनानगर येथे घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. यात १५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. संजय रामनाथ वैद्य (रा.श्रीनाथजी रो हाऊस,सेंट फ्रान्सिस स्कूल जवळ) यांनी या चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वैद्य कुटूंबिय ७ ते १६ मे दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख १५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
नााशिक – दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी केले गजाआड
नाशिक : दोन वर्षासाठी हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. सागर गणपत बोडके (२२ रा.फुलेनगर,पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. बोडके याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीसांनी सागरला दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच मंगळवारी तो दिंडोरीनाका परिसरात असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली. पथकाने सापळा लावून त्यास जेरबंद केले असून हवालदार योगीराज गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.