सीसीटिव्ही कॅमेरे तोडून स्पेअरपार्ट चोरट्यांनी केले लंपास
नाशिक : अंबड औद्योगीक वसाहतीतील वैष्णवी अॅटो प्रा.लि. या कारखान्यात सीसीटिव्ही कॅमेरे तोडून चोरट्यांनी कारखान्यातून सुमारे १ लाख ७२ हजार रूपये किमतीचे स्पेअरपार्ट लंपास केले. योगेश बिडे (रा.शिवशक्तीचौक,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून या चोरीप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिडे वैष्णवी अॅटो प्रा.लि. या कारखान्याचे काम बघतात. रविवारी अज्ञात तीन चोरट्यांनी कारखान्याच्या पाठमागील प्रवेशद्वाराचा कडी कोयंडा कापून कारखाना आवारात प्रवेश केला. यानंतर भामट्यांनी सीसीटिव्ही यंत्रणेस लक्ष करीत कॅमेरे तोडून टाकले व कारखान्यातील कॉन्टॅक आर के नावाचे १०० इलेक्ट्रीक पार्ट व कॉपरचे १२० नग आणि एन डब्ल्यू फिक्स कॉन्टॅकचे दहा बॉक्स असा सुमारे १ लाख ७२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना नुकसान करण्यात आलेल्या सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून पोलीस चोरट्या त्रिकुटाचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले करीत आहेत.
मद्याच्या नशेत छतावरून पडल्याने ३५ वर्षीय तरूणाचा मृत्यू
नाशिक : गंजमाळ परिसरात मद्याच्या नशेत छतावरून पडल्याने ३५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पावसाळयापूर्वी पत्र्यांची डागडूजी करण्यासाठी हा इसम छतावर गेला होता. सुरेश बबन जावळे (३५ रा.भिमवाडी,सहकारनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जावळे हा सोमवारी मद्याच्या नशेत आपल्या घरावरील पत्र्यांची डागडुजी करीत असतांना ही घटना घडली. अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने बेशुध्द अवस्थेत कुटूंबियांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता औषधोपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.