नाशिक – इंदिरानगरमधील प्रशांतनगर येथे मल्हार बिल्डिंगच्या तळमजल्यावर उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक गाडीला लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या आठ गाड्या जळून खाक झाल्या. ही आग इलेक्ट्रीक गाडीला कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नाही. पण, गाडीतील बॅटरीमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रस्त्यावरून जात असलेल्या काही युवकांच्या आग लागल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अग्निशमन दल व पोलीस स्टेशनला आगीची माहिती दिली. ही यंत्रणा पोहचेपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. बिल्डींगमधील रहिवाशांना आग लागल्याचे कळताच ते प्लॅटमधून खाली उतरले. त्यानंतर त्यांनी पाण्याच्या टाकीमधून पाणी काढून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, आग आटोक्यात आली नाही. अखेर अग्निशमन दलाचे कर्मचारी आले आणि त्यांनी ही आग विझवली. या आगीत सुमारे दोन लाख साठ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. इंदिरानगर पोलीस स्टेशनचे एपीआय निसार सय्यद तसेच पोलीस कॉन्स्टेबल शेख, दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.