मुंबईच्या कारचालकास सीएनजी पंपावरील कामगारांनी केली बेदम मारहाण
नाशिक : विल्होळी येथे अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिल्याने मुंबईच्या कारचालकास सीएनजी पंपावरील कामगारांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी अक्षय नारायण कामत (रा.दातार कॉलनी भांडूप) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन व्यवस्थापकासह सहा सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब आव्हाड, व्यवस्थापक नरेंद्र हिरालाल प्रसाद व अन्य ६ जण अशी संशयितांची नावे आहेत. कामत रविवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास आपल्या वाहनात सीएनजी गॅस भरण्यासाठी विल्होळी येथील महाराष्ट्र नॅचरल गॅस या पंपावर गेले असता ही घटना घडली. कामत आपल्या वाहनात गॅस भरण्यासाठी नंबर लावून पंपावर पोहचले असता ऑनलाईन पेमेंट तथा कार्ड पेमेंट बंद असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कामत यांनी आव्हाड नामक कामगारास ऑनलाईन पेमेंट बाबत विनंती केली असता त्याने अतिरिक्त ४० रूपयांची मागणी केल्याने हा वाद झाला. याप्रसंगी कामत यांनी अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिल्याने शाब्दीक चकमक होवून ही घटना घडली. संतप्त व्यवस्थापत नरेंद्र प्रसाद व कामगारांनी कामत यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. अधिक तपास जमादार एस.टी.शेळके करीत आहेत.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : आपल्या राहत्या घरी ३२ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मखमलाबाद येथील सिध्दार्थनगर भागात घडली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूचू नोंद करण्यात आली आहे. गजराज सुनिल गांगुर्डे (३२ रा.बुध्दविहारमागे,सिध्दार्थनगर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. गजराज गांगुर्डे यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी अडगईला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत बाळासाहेब गांगुर्डे यांनी खबर दिल्याने पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोज करीत आहेत.