२६ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू
नाशिक : दारणानदीतील नदीपात्रात मित्रांसमवेत आंघोळीसाठी गेलेल्या २६ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कुणाल प्रकाश यादव (रा.गवळीवाडा,रविवार बाजार,दे.कॅम्प) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुणाल रविवारी आपल्या मित्रांसमवेत आंघोळीसाठी परिसरातील दारणा नदी पात्रात गेला होता. आंघोळ करीत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. मित्रांनी त्यास पाण्याबाहेर काढून गंभीर अवस्थेत तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.मनिषा होनराव यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.
गळय़ातील मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास
नाशिक : शिवाजीचौक भाजी मंडईत भाजीपाला खरेदी करीत असतांना वृध्द महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र चोरट्यांनी हातोहात लांबविली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पना कौतिक आहिरे (६२ रा.युग मंदिर सोसा.सिडको ऑफिस मागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आहिरे या रविवारी भाजीपाला खरेदी करण्यासाठी शिवाजीचौकातील भाजी मार्केटमध्ये गेल्या होत्या. गर्दीत भाजीपाला खरेदी करीत असतांना ही घटना घडली. भाजी खरेदीसाठी त्या वाकल्या असता अज्ञात चोरट्यानी त्यांच्या गळयातील ७० हजार रूपये किमतीची दुपदरी मणीमंगळसूत्र हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.