गाळाधारकास दीड लाखांचा गंडा
नाशिक : एटीएमसाठी गाळा भाडे तत्वावर घेण्याचा बहाणा करीत भामट्यांनी वृध्द गाळेधारकास दीड लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत भामट्यांनी अमानत म्हणून काही रक्कम भरण्यास भाग पाडले तर उर्वरीत रक्कम बँक खात्याची गोपनिय माहिती मिळवून परस्पर आॅनलाईन लांबविली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागराज गणपत राठोड (७० रा.श्रीरामनगर,जत्रा हॉटेल शेजारी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राठोड यांचे श्रीरामनगर येथील संकल्प प्लॉट नं. ४७ – ४८ या निवासी भागात गाळे आहेत. गेल्या वर्षी वेगवेगळया मोबाईल नंबर वरून संपर्क साधण्यात आला होता. नामांकित बँकेच्या एटीएम बुथसाठी गाळा पाहिजे असल्याचे यावेळी भामट्यांकडून सांगण्यात आले. यासाठी राठोड यांना एसबीआय बँकेच्या १३९८५५९८२९८३ या खातेधारकाच्या अकाऊंटमध्ये ९४ हजार ५७५ रूपयांचा भरणा करण्यास भाग पाडण्यात आले. मात्र भाडेकरार न झाल्याने व राठोड यांनी पैश्यांसाठी तगादा लावल्याने २४ एप्रिल २०२१ रात्री भामट्यांनी संपर्क साधून पैसे परत करीत असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून पुन्हा ४९ हजार ९९९ रूपये परस्पर आॅनलाईन लांबविले. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.
…..