नाशिक : गोदापात्रात अनोळखी तरूणाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना मिळून आला असून त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत आहे. ३५ वर्षीय सदर युवक पाण्यात वाहून आल्याचा अंदाज बांधला जात आहे. पण, डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. या तरुणाबाबत माहिती असल्यास पंचवटी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे. टाळकुटेश्वर पुला खाली बुधवारी सकाळच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना स्थानिकांना दिसला. याबाबत नियंत्रण कक्षास कळविण्यात आल्याने पंचवटी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून मृताच्या डोक्यास गंभीर दुखापत असल्याने तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान गोदावरीस सध्या आवर्तन सोडण्यात आल्याने सदरचा मृतदेह पाण्यात वाहून आला असल्याचा अंदाज बांधला जात आहे.