नाशिक : खोडेनगर भागात किराणा घेवून घराकडे परतणा-या सासूच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले. ही घटना झाली त्यावेळेस सूनही सासूच्या बरोबर होती. या चोरीप्रकरणी निलीमा अविनाश कुलकर्णी (रा.आठवण हॉटेलमागे,विधातेनगर) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलकर्णी बुधवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या सुनेस सोबत घेवून खोडेनगर परिसरातील साईनाथ किराणा दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी करून दोघी सासू सुना घराकडे परतत असतांना ही घटना घडली. प्रथम अपार्टमेंट समोरून दोघी पायी जात असतांना समोरून काळया दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने सासू निलीमा कुलकर्णी यांच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोंदळे करीत आहेत.