नाशिक : शरदचंद्र मार्केट यार्डमध्ये असलेल्या किराणा दुकानातून चोरट्यांनी गल्यातील रोकडसह लाखोंचे तेलाचे डब्बे लंपास केल्याची घटना घडली आहे. तेलाचे भाव वाढल्यामुळे चोरट्यांनी तेलच चोरून नेले. या चोरीप्रकरणी जितेंद्र मांगिलाल भंडारी (रा.अशोकस्तंभ) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारी यांचे शरदचंद्र मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वाराला लागून जे. एम. ट्रेंडर्स नावाचे होलसेल किराणाचे दुकान असून मंगळवारी रात्री या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून ही चोरी केली. गल्यातील दहा हजाराची रोकड, साबुदाण्याचा कट्टा व वेगवेगळया कंपनीच्या खाद्य तेलांचे डबे असा सुमारे ४ लाख ७६ हजार ५८० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या चोरीप्रकरणी अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.