नाशिक : आर्थिक देवाणघेवाणीतून महिलेचा विनयभंग; मुंबई नाका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
नाशिक : मुंबईनाका भागातआर्थिक देवाणघेवाणीतून महिलेचा विनयभंग करुन मुलाचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली. या घटनेनंतर मुंबईनाका पोलीस ठाण्यात विनयभंग आणि जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला कलंकार (रा.पाथर्डी फाटा) व कृष्णा मुंडे (रा.चेहडी पंपीग) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. पीडिता व तिचा मुलगा मंगळवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास शताब्दी हॉस्पिटल समोरून जात असतांना संशयितांनी त्यांना गाठले. यावेळी पीडित महिलेकडे धनादेश व बॉण्ड पेपर मागण्यात आला मायलेकांनी पेपर देण्यास नकार दिल्याने संतप्त दोघांनी महिलेचा मुलाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. या झटापटीत मुलाचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेण्यात आला. मुलाच्या मदतीला त्याची आई धावून गेली असता संशयितांपैकी कृष्णा मुंढे याने लगेच पैसे ट्रान्सफर केले नाही तर जीवे ठार मारू अशी धमकी देत तसेच अश्लिल भाषा वापरत महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत आहिरे करीत आहेत.
महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले
नाशिक : रासबिहारी लिंक रोड भागात कारमधून सामान काढत असतांना दुचाकीस्वाराने सांगली येथील महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या चोरी प्रकरणी माधवी महादेव सुतार (५० रा.मिरज जि.सांगली) यांनी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीवरुन म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुतार या सोमवारी कुटूंबियासह भाचीच्या विवाह सोहळय़ा निमित्त शहरात आल्या होत्या. औदूंबर लॉन्स येथे रात्रीच्या वेळी त्या कारच्या डिक्कीतील सामान काढत असतांना ही घटना घडली. सामान काढत असतांना दुचाकीवरून आलेल्या भामट्याने त्यांच्या गळय़ातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून राज स्विटच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.