नाशिक : बनावट कागदपत्र आणि व्यक्ती उभी करून भूखंडांची परस्पर विक्री; तब्बल २९ जणांविरूध्द गुन्हा दाखल
नाशिक : बनावट कागदपत्र आणि व्यक्ती उभी करून भूखंड परस्पर विक्री प्रकरणात न्यायालयाच्या आदेशान्वये खरेदी विक्री करणा-या तब्बल २९ जणांविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर अयाचित,रेखा सचान,कुणाल सचान,वेदिका सचान,दिलीपकुमार पटेल,अशोक भिडे,प्रतिभा भिडे,हितेशकुमार पटेल,मंदाकिनी केदार,समिर केदार,गिरीश केदार,शामराव केदार,गोवर्धनभाई पटेल,गंगाराम पटेल,पोपटलाल पटेल,महावीर चोपडा,रविंद्र पवार,अजय पवार,नरोत्तम पटेल,सुरेश कारे,स्वाती दवंगे,विजय सराफ,फारूक मोतीवाला,पर्ल मोतीवाला,फराक मोतिवाला,सहारा मोतिवाला,अकसाने मोतिवाला,अभिजीत भालेराव व श्रावण शेळके आदींविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिपाली शिंदे (रा.शांतीपार्क जवळ,उपनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित चंद्रशेखर अयाचित याने तक्रारदार महिलेचे वडिल व अन्य सहा साक्षीदारांच्या नावे असलेली मिळकत सर्व्हे नं.७०२,१ अ क्षेत्र ० हेक्टर ६२ आरचे ०१ ते ३० भुखंडाची २१ मार्च २००५ ते २५ मे २००५ या काळात परस्पर दुय्यम निरीक्षक कार्यालयात बनावट कागदपत्र आणि बोगस इसम उभे करून खरेदी खत नोंदविले. त्यानंतर या भूखंडाची उर्वरीत संशयितांना विक्री करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.
ग्राहकास जीवे मारण्याची धमकी
नाशिक : स्लाईडींग व्यावसायीकाने आपल्या ग्राहकास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. काम न केल्याने पैसे परत मागितले असता ही घटना घडली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत दामू ताजनपुरे (४८ रा.म्हसोबा मंदिरासमोर,जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अद्वैत चंद्रशेखर सावंत (रा.समृध्दी कॉलनी,दिंडोरीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित ताजनपुरे याचा दिंडोरीरोडवर स्लाईडींगचा व्यवसाय आहे. सावंत यांनी गेल्या ऑगष्ट महिन्यात घरदुरूस्तीचे काम काढले होते. या काळात त्यांनी संशयिताची भेट घेतली असता मोजमाप घेवून व्यवहारापोटी ५२ हजार रूपये ऑनलाईन स्विकारले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही त्याने काम न केल्याने सावंत यांनी पैश्यांचा तगादा लावला असता ही घटना घडली. पैसे देण्यास नकार देत संशयिताने पुन्हा पैसे मागितले जीवे मारून टाकेन अशी धमकी दिल्याने सावंत यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.