नाशिक – वृंदावन कॉलनीत घरफोडी; दोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक : जनरल वैद्यनगर भागातील वृंदावन कॉलनीत चोरट्यांनी घरफोडी करुन दोन लाखाचा ऐवज लंपास केलला. या ऐवजामध्ये ३५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. संदिप भगवान भावसार (रा.व्यंकटेश आशिष अपा.वृंदावन कॉलनी) यांनी या घरफोडी प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावसार कुटुंबिय सोमवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे आणि भांडी असा सुमारे १ लाख ८७ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक एस.एस.पाटील करीत आहेत.
घरातून लॅपटॉप चोरीला
नाशिक : सरस्वतीनगर भागात घरातून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल प्रभाकर शेवाळे (रा.लक्ष्मी छाया अपा.केके वाघ समोर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. गेल्या गुरूवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. शेवाळे व त्यांचे मित्र आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाज्यातून रूममध्ये प्रवेश केला व टेबलावर ठेवलेला सुमारे २५ हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास जमादार ए.एन.पाटील करीत आहेत.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : ४५ वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बजरंगनगर भागात घडली आहे. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुनीर समी शेख असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. शेख यांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून छताच्या लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नवशाद शेख यांनी खबर दिल्याने सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक कोरडे करीत आहेत.