चाकू हल्यात तीन जण जखमी
नाशिक : मागील भांडाणाच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत धारदार चाकूचा वापर करण्यात आल्याने तीन जण जखमी झाले. ही घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयीतांना अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल खरात (१९) व राकेश वाघ (२१ रा.दोघे अशोकनगर,सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. तन्मय खंडू कांबळे (२२ रा.श्रमिकनगर) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,तुषार उर्फ बबलू जगताप (रा.अशोकनगर) व वरिल दोघा संशयीतांनी बुधवारी (दि.९) श्रमिकनगर येथील जुने महिंद्रा गोडावून जवळ आपणास गाठून मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. तसेच तुला जास्त माज आला आहे का असे म्हणत तुषार जगताप याने धारदार चाकूने वार केले तर उर्वरीत दोघांनी लाथाबुक्यानी मारहाण केली. तर बबलू उर्फ तुषार प्रमोद जगताप याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तन्मय कांबळे,योगेश जाधव आणि चैतन्य निकम आदींनी भांडण मिटविण्याच्या कारणातून कुरापत काढून योगेश जाधव याने आपल्या हातातील चाकू हिसकावून घेत मित्र राहूल खरात आणि आपल्यावर चाकू हल्ला करून दुखापत केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील व पोलीस नाईक सिध्दपुरे करीत आहेत.
…..
भंगार दुकानदारासह त्याच्या कामगारांना मारहाण
नाशिक : भंगार खरेदी विक्रीच्या कारणातून ग्राहकाने दुकानदारासह त्याच्या कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना दिंडोरीरोडवरील विद्यूत नगर भागात घडली. याघटनेत दुकानमालक जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू विष्णू गांगुर्डे (रा.पाटावर,विद्यूतनगर) असे मारहाण करणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष बालकिसन भारद्वाज (रा.सदर) यांनी तक्रार दाखल केली आहे. भारद्वाज यांचा दिंडोरीरोडवरील पाटाजवळ भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. गुरूवारी (दि.१०) सायंकाळी ते आपल्या नियमीत कामात व्यस्त असतांना संशयीत भंगार विक्री करण्यासाठी आला होता. यावेळी त्याने आपल्या भंगाराचे वजन जास्त असल्याच्या कारणातून वाद घालत दीपक पवार आणि सचिन नामक कामगारांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी दुकानमालक भारद्वाज वाद मिटविण्यासाठी गेले असता संशयीताने आपल्या दुचाकीतील लोखंडी वस्तूने त्यांना मारहाण केली. याघटनेत भारद्वाज जखमी झाले असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
……
तरूणीची आत्महत्या
नाशिक : विषारी औषध सेवन करून १९ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना चुंचाळे शिवारात घडली. युवतीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आले आहे. वनिता प्रकाश कामडी (रा.घरकुल योजना) असे आत्महत्या करणा-या युवतीचे नाव आहे. वनिता कामडी हिने गुरूवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना तिचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार सांगळे करीत आहेत.