नाशिक : उपनगरामधील तीन मुली सोमवार पासून बेपत्ता असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अपहरण झालेल्या या मुली शहरातील वेगवेगळ्या भागातल्या आहे. याप्रकरणी उपनगर,अंबड आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंबड औद्योगीक वसाहतीतील कारगिल चौकात राहणारी अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्री पासून बेपत्ता आहे. तिला कोणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज बांधला जात असून याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत. जेलरोड परिसरातील लोखंडे मळा भागात राहणारी मुलगी सोमवारी पाणी भरत असतांना बेपत्ता झाली आहे. घरात कुणास काही एक न सांगता ती निघून गेली असून यापूर्वीही ती दोन वेळा बेपत्ता झाली होती. परंतू काही दिवसांनी ती घरी आली होती. सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून न आल्याने तिला कुणी तरी पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत. दुसरी घटना याच भागातील प्रगतीनगर भागात घडली. राजराजेश्वरी चौकात राहणारी मुलगी सोमवार पासून बेपत्ता आहे. तिला दसक येथील केतन आढाव या युवकाने पळवून नेल्याचा संशय कुटूंबियांनी व्यक्त केल्याने याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सी.एम.वाघ करीत आहेत.