नाशिक : गंजमाळ परिसरात मद्यप्राशन करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तीन जणांच्या टोळक्याने तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत युवक जखमी झाला आहे. शेहबाज शेख,पांड्या उर्फ पांडूरंग शिंगाडे व एक अनोळखी इसम अशी तरूणावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. सुरज राजू भालेराव (२१ रा.श्रमिकनगर,गंजामाळ) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालेराव सोमवारी सय्यद पिरबाबा दर्गा येथील बंद पडलेल्या थेअटर जवळून आपल्या मित्रांसमवेत जात असतांना ही घटना घडली. संशयित त्रिकुटाने वाट अडवित भालेराव याच्याकडे दारू सेवन करण्यासाठी पैश्यांची मागणी मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त त्रिकुटाने त्यास शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत कोयता आणि लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने भालेराव जखमी झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.