नाशिक : दोन चो-यांमध्ये चोरट्यांनी अडीच लाखाचे दागिणे लंपास केले आहे. याप्रकरणी गंगापूर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही चोरीच्या घटना शहरात वेगवेगळय़ा भागात झाल्या आहे. पहिली घटना नाणेगाव येथे घडली. याप्रकरणी अनुसया निवृत्ती आडके (रा.आई भवानी मंदिर,नाणेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी आडके कुटूंबिय आपल्या घरात असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून बेडवरील गादी खाली ठेवलेली सोन्याची पोत व नाकातील नथ असा सुमारे ७० हजार रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार पाचोरे करीत आहेत. तर दुस-या घटनेची तक्रार अशोक गणपतराव अवताड (रा.वेदांत बंगला,प्रोफेसर कॉलनी,गंगापूररोड) यांनी दिली आहे. २४ एप्रिल रोजी अवताड कुटुंबिय आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून प्रवेश करीत बेडरूममधील कपाटातून सोन्याच्या बांगड्या व कॉईन असा सुमारे १ लाख ८० हजार १४ रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.