नाशिक : औद्योगीक वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसापासून चो-यांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात दोन चो-यांच्या घटना घडल्यामुळे उद्योजकांची चिंता वाढली आहे. चोरट्यांनी दोन कारखान्यांमध्ये शिरून दीड लाखाचा ऐवज लंपास केला आहे. त्यात रोकडसह स्पेअर पार्टचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना अंबड औद्योगीक वसाहतीतील बंपर इंडिया प्रा.लि कारखान्यात घडली. याप्रकरणी श्रीनिवास वामन सांगलीकर (रा.चार्वाक चौक,इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. १ मे रोजी कामगार दिनानिमित्त कारखाना बंद असल्याने ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारखान्याच्या कंपाऊंडची जाळी कापून सुमारे ६५ हजार रूपये किमतीचे सेमीफिनिश व रॉ मटेरियल चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. तर दुस-या घटनेची तक्रार दीपक नथू पाटील (रा.आयोध्या कॉलनी,पाथर्डी रोड) यांनी केली आहे. पाटील सातपूर औद्योगीक वसाहतीतील इंटेक्स कंट्रोल्स कारखान्याचे काम बघतात. ३० एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी कारखान्यात प्रवेश करीत ऑफिस मधील ड्रावरमधून १४ हजारांची रोकड,मोबाईल व अन्य साहित्य असा सुमारे ७२ हजाराचा ऐवज चोरून नेला. सदर घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.