नाशिक – दिंडोरीरोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ अल्टो कारमधून अपहरण करीत युवकास टोळक्याने बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला आहे. या मारहाणीत हातातील लोखंडी कड्याचा वापर करण्यात आला. याप्रकरणी श्रेयस बचाराम पाटील (१८ रा.वृंदावननगर,म्हसरूळ) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. तेजस सोनार,रोशन जाधव,शुभम शिरसाठ व वेदांत बाविस्कर असे युवकास मारहाण करणा-या टोळक्याचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटील रिलायन्स पेट्रोलपंप परिसरातील पी.व्ही.जी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (दि.२९) सकाळच्या सुमारास तो कॉलेज बाहेर पडत असताना ही घटना घडली. प्रवेशद्वारा बाहेर अल्टो कारमधून एमएच १५ बीएक्स ४८२० आलेल्या टोळक्याने त्यास जवळ बोलावून घेतले. यावेळी टोळक्याने शिवीगाळ करीत तूला माज आला आहे का ? महिलेचा फोन का उचलतोस, तुझा काय संबध असे म्हणत त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त टोळक्याने एवढ्यावरच न थांबता त्यास बळजबरीने कारमध्ये बसवून किशोर सुर्यवंशी मार्गावर नेले. ओंकार बंगल्या जवळ त्यास वाहनातून उतरवत पुन्हा मारहाण केली. या घटनेत पाटील यास हातातील कड्याने मारहाण केल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक व्ही.डी.आहिरे करीत आहेत.