नाशिक – चेन स्नॅचिंग करणा-या युवकाला पोलिसांनी गजाआड करुन त्याच्याकडून अंबड, गंगापुर व सातपुर पोलीस ठाणे हद्दीतील एकुण ९ गुन्हयांतील ४ मोटार सायकल व ५ सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ३५ हजार ७५६ रूपये किंमतीचा मुददेमाल केला जप्त करण्यात आला आहे. आणखी काही गुन्हे या संशयिताकडून उघड होण्याची शक्यता आहे. हा आरोपी शहरातील विविध भागातून चेन स्नॅचिंग केल्याचेही उघड झाले आहे. प्रकाश भारत कुमावत असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
अंबड पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांना सावता नगर येथील युवकाने गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंग केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अंबड पोलिसांनी सदर युवकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली असता सिडको भागात त्याने चार चेन स्नॅचिंग केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तर गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत देखील त्याने केलेल्या चेन स्नॅचिंगचा गुन्हा त्याकडून उघड झाला असून अंबड पोलिसांनी या संशयिताकडून ११६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सातपूर, अंबड पोलिस ठाणे हद्दीतुन चोरी झालेली दुचाकी देखील हस्तगत केली आहे. अधिक तपास अंबड पोलीस करत आहे.