नाशिक – मद्य सेवन करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण
नाशिक : चार जणांच्या टोळक्याने मोटारसायकलचे नुकसान करीत दोघा मित्रांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मद्य सेवन करण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून ही मारहाण करण्यात आली. या घटनेत एकाचा मोबाईल बळजबरीने हिसकावून टोळक्याने पोबारा केला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय पाटील,अक्षय भंगाळे, मनोज लोंढे व कुणाल नामक तरूण (रा.तिघे सातपूर) अशी लुटमार करणा-या टोळक्याचे नाव आहे. याप्रकरणी अमोल तुळशीदास देवकर (२१ रा.अशोकनगर,सातपूर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. देवकर व गणेश आहिरे हे दोघे मित्र बुधवारी रात्री जाधव संकुल कडे जाणा-या मार्गावरील गणेश कृपा मेडिकल स्टोअर्स या दुकानासमोर गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली. संशयित टोळक्याने दोघा मित्रांना गाठून दारू सेवन करण्यासाठी पैश्यांची मागणी केली. यावेळी पैसे देण्यास नकार देण्यात आल्याने हा वाद झाला. संतप्त टोळक्याने दोघा मित्रांना शिवीगाळ करीत एकास लाकडी दांडक्याने तर आहिरे याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता टोळक्याने दुचाकीचे तोडफोड करीत आहिरे याचा मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.
मोबाईल चोरीला
नाशिक : अमरधामरोड भागात घरात शिरून चोरट्यांनी चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निता अमोल सुपेकर (रा.जीवन किराणा दुकाना समोर,अमरधामरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सुपेकर कुटूंबिय गुरूवारी (दि.२८) सकाळच्या सुमारास आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत प्रवेश करून चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक एस.व्ही.जाधव करीत आहेत.