नाशिक : नवनाथनगर भागात एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेत संशयिताने पीडितेस दगडफेकून मारल्याने ती महिला जखमी झाली आहे. मुलीस अपशब्द वापरल्याने तुझ्या आईला सांगते असे म्हटल्याने ही घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. दिपक उर्फ नांदु-या काळया (४५ रा.सावकार चौक,लोखंडे पुल नवनाथनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूध्द पंचवटी आणि गंगापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार ती सोमवारी सकाळी शेजारी राहणा-या कुटुंबियांकडे गेली असता ही घटना घडली. भाजीसाठी टोमॅटो घेण्यासाठी महिला गेली असता सदर ठिकाणी संशयित आला. त्याने महिलेच्या मुलीस अपशब्द वापरले त्यामुळे पीडितेने थांब तुझ्या आईला सांगते असे म्हटल्याने संतप्त झालेल्या संशयिताने पाठलाग करीत महिलेचा विनयभंग केला. यावेळी त्याने महिलेस दगड फेकून मारल्याने ती जखमी झाली असून महिला उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.