नाशिक : आडगाव येथे एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम बुथवर एटीएम मशिनमध्ये अडकलेल्या कार्डचा गैरवापर करून एक लाखाची रक्कम परस्पर काढून घेतले अडकलेला कार्ड काढण्यासाठी सुरक्षारक्षकास बोलविण्यास सांगून कार्डचा गैरवापर करण्यात आला. याप्रकरणी सिडकोतील सुरेशचंद्र शाहू पाटील (रा.पवननगर,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन आडगाव पोलिस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील मंगळवारी कामानिमित्त आडगाव येथे गेले होते. सायंकाळी एसबीआय बँकेच्या आडगाव शाखा येथील एटीएम बुथवर पैसे काढण्यासाठी ते गेले असता ही घटना घडली. अचानक मशिन बंद पडल्याने त्यांचे एटीएम कार्ड अडकले. याप्रसंगी पाठीमागे हेल्मेट परिधान केलेल्या तरूणाने त्यांना तुम्ही कार्ड काढू नका सुरक्षा रक्षकास बोलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पाटील सुरक्षा रक्षकास शोधण्यास गेले असता संशयिताने एटीएम कार्ड काढून घेत परस्पर वेगवेगळ्या ठिकाणाहून पाटील यांच्या बँक खात्यातील एक लाख रूपये काढून घेतले. अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.